---------------बाई ------------
जन्म देते लेकराले
कळा सोसून अपार...||
करी काबाळ कष्ट हो
माय सकाळ दुपार...||
ओळ घेऊन भावाची
यते बहीण गावाले...||
मने पाईन डोयानं
लई दिसानं भावाले...||
झोपी लागल्या लेकरा
कशी थोपटते आजी...||
तिले माईत पुराण
तिनं रांदली वं सोजी...||
देल्ल लाऊन लगन
नाई भरली करीले...||
भल्या पायटं उटून
बाई जाते मजुरीले...||
आण जाऊन शाळत
लेक झाळून वं घर...||
काळे वाचून पुस्तकं
देते शाबासकी सर...||
लेक शिकून शिकून
झाली मास्तरीण बाई...||
रोज संबाळून घर
पोरं शिकवाले जाई...||
दर मयन्यात येते
तुमी मनता इटाळ...||
जिले आली नाई पाळी
तिले होईन का बाळ...?
बाळ जीवाचा तुकळा
तिनं पोसलं बाळाले...||
होजो आदारे रे बापु
तीच्या थकल्या काळाले...||
गेला लेक सीमवर.
माय रडलीच नाई...||
होता ठेवला दगड
तिनं काळजात बाई...||
एक असते वं माय
एक असते वं लेक...||
बाळांतीणीलेच कळे
माय ममतेची हाक...||
आंग चोरून बसते
चार चवघात बाई...||
हाय नाजूक नाजूक
भारा उचलते डोई...||
डोई पदर मानाचा
शोबे कुकवाचा भांग...||
अशी लाजू नोको पोरी
नाव नवऱ्याचे सांग...||
जन्म मरणाचा फेरा
बांद बाशिंग कपाळा...||
झाली माय बईन वं
तिले फुटतो जीवाळा...||
येनं पेऊन तू दारू
कुरकुरतेस बाई...||
झालं बरं का वाईट
हुरहूरतेस बाई....||
सुक दुकाचा संसार
याची काय नवलाई...||
होतो आदार माणूस
घर सवारते बाई...||
जाते सोडून गावाले
घरं होते सुनं सुनं...||
असं नशीब बाईचं
सांगा लियलं जी कोण...||
-विदर्भ एक्सप्रेस
समाजमनाची सफर
(रेखा उत्तमराव राऊत )
वऱ्हाडी कविता :बाई
____________________________________
No comments:
Post a Comment