माझ्या मराठी मातीचा,आहे मला अभिमान ||धृ ||
माय मराठी गं माझी,गाते जात्यावर ओवी||
करी वावरी घुगऱ्या, जमे पंगतच गावी ||
गावातल्या पंगतीत, भाऊबदकीचं छान ||1||
माझ्या मराठी मातीचा, आहे मला अभिमान ||
घाम गाळला कष्टाने, शेत फुले माळावर||
घडे नशीब आमुचे, नांगराच्या फाळावर ||
नांगराच्या फाळाचं गं,आहे लोखंडीचं पानं ||2||
माझ्या मराठी मातीचा, आहे मला अभिमान ||
म्हणे तुकोबा तुकोबा, ग्रामगिता आचराणं ||
ठेवा संस्कृतीचा जिचा, अशी मराठी महान ||3||
दारी रांगोळी घालते, दिवावात तुळशीला ||
चाक कुंभाराचे देई, गोड पाणी कळशीला ||
आणि वट्यात घेऊन, पतीदेवासाठी हाणं ||
माझ्या मराठी मातीचा, आहे मला अभिमान ||4||
माझी मराठी गं माय, जपतसे लोककला ||
वाढवले जगवले, माय मराठीने मला ||
मराठीची लेक मी गं, आहे किती भाग्यवान ||5||
माझ्या मराठी मातीचा, आहे मला अभिमान ||
माय मराठी गं माझी, डोई पदर ठेवते ||
पुण्यवन्त माऊली गं,कुंकू कपाळी लेवते ||
लेवलेल्या कुंकवाला, संग हळदीचा मान ||6||
माझ्या मराठी मातीचा, आहे मला अभिमान ||
-रेखा उत्तमराव राऊत
यवतमाळ