_________________________
कोरोना आला. सगळीकडे भीतीचं वातावरण पसरलं. काहींचे आधार गेलेत. काही निराधार झाले. काहींना अन्नापाण्याचा प्रश्न पडला. काही विनाकारण मेलेत. काहींचा हाताखालचा व्यवसाय गेला तर काहींची पोट भरण्याची नोकरी ही गेली. काही बेरोजगार झाले ;तर काहींनी रोजगार शोधण्यासाठी भटकंती केली. आयुष्याचे असेही पैलू आपण सगळ्यांनी कोरोनाच्या रूपात अनुभवलेच...आणि कोरोनाचे भयानक परिणाम अनुभवून मरून जगून वाचलेले आपण.आयुष्याने पुन्हा एकदा संधी दिली आणि पुन्हा एकदा या जीवाने जगण्याची धडपड कायमची सुरु केली. ऑफलाईन ऑनलाईन पेपर परीक्षा शाळा कॉलेज असं करता करता माझे कोरोनाचे दोन डोस सुद्धा कंप्लिट झाले. यातच पंच्यानवव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये माझी" पेरणी "ही कविता निवड झाली याचा मनापासून आनंद आहे. यावर्षी नेटाने दोन कवी संमेलनामध्ये मी सहभाग नोंदवलाच. एक म्हणजे शब्दास्त्र विचारमंच अमरावतीला निमंत्रित कवयित्री म्हणून मान मिळाला आणि दुसरं म्हणजे समतापर्व प्रतिष्ठान यवतमाळ मध्ये प्रोत्साहन पर बक्षीसाचे मानकरी झाल्याची नक्कीच खुशी आहे.अ ss...काही दिवसांपूर्वीच एक कविता लिहिली.ती कविता या संमेलनात सादर करण्याची इच्छा बरीच पूर्ण झाली. चार लोकांनी ती ऐकली. मनाचं समाधान झालं.ती कविता लिहिताना काळजाच्या कप्यांना कंप उगाच फुटत नसतो आणि श्वास संपताना सगळं काही विसरांत पडून जीव कुठेतरी एकरूप होऊ पाहतोय. होय!हाच तो अविस्मरणीय हृदयाचा हृदयात झालेला बोलका भास झाला. "बाई " होय!बाई च नाव दिलं मी या कवितेला.ती वाचाल तुम्ही. त्यात माझे काळीज मी गोठवलं आहे. श्वास अविरत होऊ घातलेयं. बोलतात ती स्पंदणे हाडमासाने जगली आहे. आहेच काय ही कविता वाचा जरा...
"बाई "
जन्म देते लेकराले, कळा सोसून अपार...||
करी काबाड कष्ट रे,माय सकाळ दुपार...||
ओळ घेऊन भावाची, यते बईन गावाले...||
मने पाईन डोयान, लई दिसान भावाले...||
झोपी लागल्या लेकरा, कशी थोपटते आजी...||
तिले माईत पुरान, तिनं रांदली रे सोजी...||
आन शाळत जाऊन,लेक झाळते वं घर...||
काड वाचून पुस्तक, देते शाबासकी सर...||
लेक शिकून शिकून, झाली मास्तरीन बाई...||
रोज संबाळून घर, पोरं शिकवाले जाई||
देल्ल लाऊन लगन, नाई भरली करीले...||
भल्या पायटे उटून, बाई जाते मजुरीले...||
दर मयन्यात यते, तुमी मनता इटाळ...||
जिले आली नाई पाळी, तिले होईन का बाळ...||
बाळ जीवाचा तुकडा, तिनं पोसलं बाळाले...||
होजो आदार रे बापु, तीच्या थकल्या काळाले...||
एक असते वं माय, एक असते वं लेक...||
बाळांतिनीलेच कळे, माय ममतेची हाक...||
आंग चोरून बसते, चारचवघात बाई...||
हाय नाजूक नाजूक, भारा उचलते डोई...||
डोई पदर मानाचा, शोबे कुकवाचा भांग...||
अशी लाजू नोको बाई, नाव नवऱ्याचे सांग...||
येन पेऊन तू दारू, कुरकुरतेस बाई...||
झालं बरं का वाईट, हुरहूरतेस बाई...||
जन्म मरनाचा फेरा,बांद बाशिंग कपाळा...||
झाली माय बईन वं, तिले फुटतो जीवाळा...||
सुक दुकाचा संसार, याची काय नवलाई...||
होतो आदार मानुस, घर सवारते बाई...||
जात सोडून मायेर, घर होते सुनं सुनं...||
असं नशीब बाईच, सांगा लियलं जी कोन...||
अविरत अविश्रांत आयुष्याचे प्रत्येक क्षण जगण्याचं बळ देणारी कविता शब्दांची बीज करून जीवनाच्या भूपटावर मी पेरू पाहते आहे. दिशा अंधारलेल्या असताना धुसरशा वाटा ही चालू पाहते आहे. सुर्योदय सूर्यास्त सगळं काही जीवन्त आहे.मनातली मरगळ पुन्हा झडकून द्यावी आणि एक कविता यातून पुनर्जन्म घ्यावी इतकेच.साहित्यिकाचा जन्म आपला चला साहित्याचा प्रवास करूया. प्रथमच एक संमेलन त्यात जायचं म्हणजे जायचं. विचार पक्का केला. साधारण चारशे किलोमीटर खंडणी ते अमरावती एवढा प्रवास करून एका कवितेसाठी. यावर्षी कवयित्री म्हणून मिळालेला अनुभव फारच छान होता. "प्रेमवेडी ", "पेरणी ", "बाप ", "माय मराठी " मले काय पायजे ", जात्यावरलं गाणं " "आमच्याकडे असा वसंत येतो " सोबतच "बाई " अशी लागवड काव्यजमिनीत केली. तीने समाजमनाची भरगोस उत्पादन देऊन प्रत्येक मनास आधार रुपी समाधान द्यावं हीच आशा आहे. शेवट शेवट बाप कविता मांडते आहे. की... बाप शेती करायचा मी ऑफिसात काम करायचो...||
बाप पोटासाठी राबराब राबायचा, मी सहज म्हणून हातात औत धरायचो...||
हल्ली जोरदार पाऊस आला...|| आमच्या पिकाचं नुकसान झालं...||
मला फक्त बापाच्या व्यथा कवितेत मांडता आल्या होत्या...||
प्रत्यक्षात मात्र त्याच्या काळजाच्या चिंध्या चिंध्या झाल्या होत्या...||
आणि म्हणलं पोटात कसं काय तू पचवतोस रे बाबा...||
बाप हसून म्हणाला. मी बाप आहे ना रे बाबा...||
मी बाप आहे ना रे बाबा...||
...आयुष्य खरच खूप सुंदर आहे ;कारण त्याला दुःखाच्या झळा आणि सुखाची सर मिळत असते अश्याच सुखा दुःखात आपलीच विदर्भ एक्सप्रेस आपल्यासाठी नवनवीन भावनाविलास मांडण्यास तत्पर राहो एवढंच लेखणीला बळ दया.आणि असेच सुखा दुःखात आनंदी रहा. जगण्यासाठी आयुष्य आहे ते पुन्हा पुन्हा मिळणारे हंगामी ऋतू ही नाही. खुशीत रहा आनंदी रहा... आणि माझे छान छान लेख नक्की बरे वाचत रहा.म्हणूनच या दोन ओळी तुमच्या सगळ्यांसाठी लिहीत आहे."हसा. खळखळून हसा. असे हसा की गालावरती खळी आली पाहिजेत आणि या आनंदात सामील होण्या सुगंधाचा बाग सोडून गुलाबाची कळी आली पाहिजे."
. रेखा उत्तमराव राऊत
______________________
No comments:
Post a Comment