चला आनंदी आनंदे,
करू पंढरीची वारी...||
विठूराया रखुमाई,
साऱ्या दुःखातून तारी...||
भजनाच्या पक्तीसंगे,
टाळ मृदूंगाची साथ...||
पंढरपूरासी वारी,
निघालीया दिनरात...||
धोतराची जोडी संग,
आहे पागोट नी शेला...||
ओढ तुझी मनामध्ये,
सांगा हो चंद्रभागेला...||
आणली गं तुझ्यासाठी,
चोळी आणिक लुगडी...||
रुसू नको रखुमाई,
आली घालत फुगडी...||
वारीतल्या मुक्कामाची,
गाठभेट भक्तीभावे...||
क्षीण हरे, स्फूर्ती येई,
विठू नाम मुखी घ्यावे...||
वारी होई भक्तीमय,
गाऊ तुक्याचे अभंग...||
देई सुखार्शीवाद हो!
रखुमाई पांडुरंग...||
भूक तहान हरली,
भक्तीमध्ये विठुराया...||
मायबापा -परी तुझी,
आहे हो आभाळमाया...||
रखुमाई माय माझी,
करी भक्ताची राखण...||
विठ्ठलाचे आहे बंधू,
साधे भोळे एक मन...||
विठ्ठलाची वारी करी,
सकलाचे याप दूर ....||
विठू विठू गजराचा,
पंढरीत एक सूर...||
मुखी विठ्ठल विठ्ठल,
नाम घेऊनी सुरात...||
विठू माझा सावळा गं,
आहे पंढरपूरात...||
पायी पायी येतो देवा,
बळ देई हो उरात...||
पांडुरंग बैसला गं,
माझ्या मनाच्या घरात...||
-रेखा उत्तमराव राऊत
(विदर्भ एक्सप्रेस )
यवतमाळ
(वऱ्हाडी कवयित्री )
No comments:
Post a Comment