Friday, July 15, 2022

गडचिरोली

गडचिरोली
_________________________
        गडचिरोलीतील कष्टकरी बांधव मंगळवार दिवस "पोलो "म्हणजे सुट्टीचा दिवस म्हणून पाळतात. तसा नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून कुणी याच्याकडे तेवढं लक्ष देत नसले तरी निसर्गरम्य अशी पर्यटन स्थळे गडचिरोलीत आहे.
सण एकोणवीसशे ब्याऐंशी मध्ये चंद्रपूर जिल्ह्याच विभाजन होऊन गडचिरोली जिल्हा तयार झाला. महाराष्ट्राच्या छत्तीस जिल्ह्यापैकी गडचिरोली हा सुद्धा एक महत्वाचा जिल्हा.वैनगंगा, गोदावरी, प्राणहिता आणि दिना या गडचिरोलीतील प्रमुख नद्या असल्या तरी गाढवी, खोब्रागडी, पाल वेलोचना, कठाणी, शिवनी, पोर, दर्शनी, पामुलगौतम, इंद्रावती व पर्लकोटा या गडचिरोलीत नद्या आहे. तसं पाहिलं तर पूर्वेकडून इंद्रावती नदीने गडचिरोली जिल्ह्याची सीमा बनवली त्यासोबतच उत्तरेला गाढवी नदी पश्चिमला अर्ध्यादूर वैनगंगा त्यानंतर वर्धा व वैनगंगेचा संगम जो चपराळ्याला होतो हा संगम म्हणजे प्राणीहीता नदी आणि दक्षिणेला गोदावरी नदी अशा प्रकारे या नद्यांनी गडचिरोली जिल्ह्याचा भुभाग सीमारेखा बनवली आहे. खरं सांगायचं तर गडचिरोलीच आकर्षण म्हणजे येथील हिरवळ आणि आदिवासी संस्कृती.
           पर्यटकांचे आकर्षण म्हणलं तर बिनागुंडा धबधबा, मार्कंडा देवस्थान ज्याला विदर्भाची काशी असं देखील म्हणलं जातं. कार्तिक स्वामींनी बांधलेले प्रशांतधाम. तसेच कमलापूर हत्ती कॅम्प जिथे आपल्याला आठ हत्ती पहायला मिळतील. अठरा दशांश पाच किलोमीटर लांबी रेल्वे मार्ग आणि देसाईगंज रेल्वे स्टेशन जे सर्व तांत्रिक सोई सुविधानी परिपूर्ण आहे. इंद्रावती व पर्लकोटा नदीचा संगम ज्याला आपण भामरागड संगम असे ही म्हणतो तिथे अस्वल आणि हरणांचा अधिवास आढळतो.तसेच वढधाम डायनोसोरचे अवशेष पहायला कुणाला आवडणार नाही. प्रकाश आमटेंचा लोकबिरादरी प्रकल्प सुद्धा गडचिरोली जिल्ह्यात आहे. सोबतच पर्यटक म्हणून पाहण्यासारखं मुथलूर हिल स्टेशन, हनुमान मंदिर खोब्रामेंढा, सिंचन प्रकल्प -दिनाप्रकल्प,सहा हेक्टर वर पसरलेले वनवैभव अलापल्ली, चपराळा अभ्यारण्य,जिथे सर्वाधिक आदिवासी जमात वास्तव्यात आहे ते वर्धा वैनगंगा संगमाचे स्थान म्हणजे चपराळा, वैरागड किल्ला, सुरजागड, गागोवा, कोटगल, अरततोंडी, बाबलाई, भामरागड अभ्यारण्य, प्राणहिता अभ्यारण्य,पल्ली जत्रा, लक्कामेटा, तसेच धानोरा यथे टोला या गावापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेला वराडी डोह जे स्थानिक पर्यटकांना वनभोजन आणि क्षेत्रभेट देण्यासाठी अतिशय सुंदर स्थळ आहे. या वराडी डोहाचा इतिहास म्हणे आधीच्या काळात आराम करायला म्हणून थांबलेली अख्खी वरात इथे डुबून मेली म्हणून या डोहाच नाव वराती डोह. अजून भारी गोष्ट म्हणजे सात बहिणीचा डोंगर . या सात बहिणीच्या डोंगराविषयीं म्हणे अशी अख्यायिका आहे की एका गोवाऱ्याने आपल्या सात मुलींचं संगोपन करता येत नाही म्हणून या डोंगरात सात बहिणी व एक भाऊ भुलवून टाकल्या तेव्हापासून हा डोंगर म्हणजे सात बहिणींचा डोंगर असं नाव पडलं याला.
      "रेला पाटा "म्हणजे आनंदाच्या क्षणी गायले जाणारे आदिवासी गीत. जसा की "रे रे ना ss...रे रे ना s रे रे ना... रेरे ना...रे रे ना sss कितोन गा मामा... पेडी तुन बसंत कितोन गा.... म्हणजे मामा तुझी मुलगी मला आवडली आहे....आणि" इद इरवाल मंडोपे... मंडोपे मरमीना...इरवाल मंडोपे.... नवडरीता मंडोपे.... मंडोपे मरमीना... इद इरवाल मंडोपे..."अशी मंगलकार्य प्रसंगी नृत्याच्या संगतीन चर्मवादनासोबत गायली जाणारी गीत फारच प्रसिद्ध.झाडीपट्टी रंगभूमी माहितेय.... भारी मजा असते. भारी मजा. सुगीच्या दिवसात म्हणजे जेमतेम डिसेंबर महिन्यात अप्रतिम नाट्यकला गडचिरोलीत सादर केल्या जातात.तीच ही झाडीपट्टी रंगभूमी.ज्यात निसर्गप्रेमी आदिवासी संस्कृती चे विलोभनीय दृश्य बघायला मिळते.येथील मुख्य पीक भात असून मोहफुले गोळा करणे, तेंदूपत्त्याचे मुडके बनवणे, चार -डिंक गोळा करणे, यरुण्या, कसूमफुल, टेंभूर, सिंदोल्या गोळा करणे असे किरकिर उपजीविकेचे छोटे मोठे कामधंदे केले जातात. तसेच धानोरा बाजारपेठ चांगल्या दर्जाचे कपडे मिळणारी बाजारपेठ असून खरेदीसाठी वडसाच महत्व ही तितकंच आहे. तसेच कवयित्री संगीता ठलाल या देखील कुरखेडा गडचिरोलीच्या असून आपल्या लेखणीतून समाजाच प्रबोधन त्या करत असतात. उंच उंच साग बांबू हे आकर्षण गडचिरोली नक्कीच दाखवते. सोबतच बांबू ची भाजी किंवा यर्वाची भाजी इथं आवडीनं खाल्ली जाते जी हातापायाला गरम आहे. असा उपयोग बांबूच्या भाजीचा. बांबू झाकून आणायचं छिलून टाकायचं,शिजवायची आणि घासून टाकायची मग तेल मीठ टाकून फोडणी देऊन खाल्याने थंडी मारत नाही. हातपाय हेकडे होत नाही असं पूर्वीचे लोकं सांगतं. तसं गडचिरोलीत एकूण बाराच तालुके आहे पण प्राणी संपत्ती वन वैभवाने नटलेली गडचिरोली जिथे कमी शहरीकरण आढळून येत. दुर्मिळ अशा कला संस्कृतीचा वारसा आजही जतन आणि संगोपन करत आहे.

-रेखा उत्तमराव राऊत
खंडणी

No comments:

साप्तहिक आत्मबल

लेखाचे नाव : "लिहिता लिहिता, वाचता वाचता."      श्रीमंतीच्या राजवाड्यात साहित्यिक जन्म घेऊ शकतो. गरिबीच्या झोपडीत साहित्यिक जन्म घ...